चला हवा येऊ द्या; घरातील एसी बंद ठेवा, खिडक्या उघडा: CM

eReporter Web Team

 

मुंबई: करोना म्हणजे हे जागतिक युद्ध आहे आणि या युद्धाची सर्वांना चांगलीच कल्पना आली आहे. या संकटाशी सामना करायचा असेल तर घरातच राहा. एसी बंद करा. खिडक्या उघडा. घरात मोकळी हवा येऊ द्या, असं सांगतानाच गुढी पाडवा आज आपल्याला जल्लोषात साजरा करता आला नाही. हरकत नाही. आपण गुढी पाडवा जरूर साजरा करू. या संकटावर मात करून आपण विजयाची गुढी नक्कीच उभारू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. सुरुवातीलाच त्यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी करोनाच्या संकटाची पुन्हा एकदा जनतेला माहिती दिली. 'काल रात्री तुमची गोंधळाची परिस्थिती झाली होती. तुमची पळापळ झाली. त्यामुळे मी सकाळी तुमच्यासमोर आलो असतो तर पुन्हा तुम्ही घाबरला असता, म्हणून दुपारी आलो. पण मी तुम्हाला नकारात्मक काहीच सांगणार नाही. तर तुम्हाला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे,' अशी सुरुवात करत ' एकूणच करोना व्हायरसची सर्वांना कल्पना आली आहे. त्याचं गांभीर्यही समजलं आहे. मागच्यावेळी मी या व्हायरसची तुलना युद्धाशी केली होती. १९७१च्या युद्धा सारखच हे युद्ध आहे. फक्त यावेळी शत्रू समोर दिसत नाही. एरव्ही शत्रू समोर असतो, तेव्हा लढायला सोपं जातं. मात्र करोना नावाचा हा शत्रू दिसत नाही. तो कुठून हल्ला करेल याची काहीच कल्पना नसते. त्यामुळे त्याच्याशी गनिमीकाव्यानेच लढलं पाहिजे. त्यासाठी आपण घरात राहिलं पाहिजे. घराबाहेर पडला की शत्रू घरात पाऊल टाकेल, त्यामुळे घरात राहा,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

'मी मिसेसचं ऐकतो, तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका'

प्रत्येकवेळी आपण गुढी पाडवा अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात साजरा करतो. गुढी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात भगवा बहर आलेला असतो. यंदा आपल्याला गुढी पाडवा असा जल्लोषात साजरा करता आलेला नाही. आज आपण शांत आहोत. गुढी पाडवा तर आपल्याला साजरा करायचा आहे. पण आज नाही. हे युद्ध जिंकल्यानंतर आपण गुढी पाडवा साजरा करू. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपल्याला युद्ध जिंकायचंच आहे. या संकटावर मात करूनच आपण विजयाची गुढी उभारूया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like