अशोक चव्हाण म्हणतात ... “मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी अवस्था झाली होती”, अशोक चव्हाणांनी उलगडला करोनाविरोधातील लढा

eReporter Web Team

ऑनलाईन रिपोर्टर 

“प्रत्यक्षात आजार झाल्यावर जी मानसिकता असते तशीच माझी स्थिती झाली होती. भीतीचं वातावरण होतं. रुग्णालयात गेल्यानंतर जेव्हा संपूर्ण रुग्णालयच करोनासाठी राखीव असतं तेव्हा बाजूच्याचा संसर्ग होऊ नये अशी भीती वाटत होती. सुरुवातीचे एक-दोन दिवस चिंतेत गेले. विषय संपेल की वाढेल अशी भीती वाटत होती. पण योग्य उपचार झाल्याने वेळेवर बरा झालो,” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. करोनाची लागण झाल्यानंतर अशोक चव्हाण यांना नांदेड येथून मुंबईला आणून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोना झाल्यानंतर मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी अवस्था झाली होती अशी भावना अशोक चव्हाण यांनी एका वेब पोर्टलशी बोलताना व्यक्त केली आहे.

“लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मी नांदेड जिल्ह्यातच होतो. लोकांना मदत करण्याचं काम सुरु होतं. स्थानिक पातळीवरचं काम करण्यासाठी पुढाकार घेत होतो. मुंबईत विधानपरिषद निवडणुकीसाठी आलो होतो. निवडणूक बिनविरोध झाल्याने लगेचच परत आलो होतो. पण रेड झोनमधून नांदेडला गेल्याने पूर्वकाळजी म्हणून मी घरीच क्वारंटाउन झालो होतो. पण पाचव्या दिवशी एक्स-रे काढला तेव्हा करोनाची लक्षणं नजर आली. पण वेळेवर निदान झालं ही सुदैवाची गोष्ट. वेळेवर उपाचर घेतल्याने अवधी कमी लागला आणि डिस्चार्ज मिळाला,” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

नांदेडमध्ये उपचार न घेता मुंबईला आल्यावरुन होणाऱ्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, “हे प्रश्न उपस्थित करणारी फक्त एकच व्यक्ती आहे. राजकरणातील पातळी अत्यंत खालच्या स्तरावर गेली आहे. कशा पद्दतीने प्रसिद्धी मिळवता येईल याचाच हा भाग आहे. नांदेडमधील विरोधी आणि इतर पक्षांनीही मला शुभेच्छा दिल्या. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मला फोन करुन शुभेच्छा दिल्या. पण एक-दोन लोक असतात ज्यांना प्रसिद्धी हवी असते”.

“कोणी कुठे उपचार घ्यावेत हा त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे. माझं सर्व आयुष्य मुंबईत गेलं. शिक्षण मुंबईत झालं. मुंबईशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. नांदेडमध्येही आहेतच, नांदेड जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. तेथील लोकांनी प्रेम दिलं. पण माझे डॉक्टर कुठे आहेत, कुठे उपचार घ्यावेत हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर कोणाला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. लोक अमेरिकेला, लंडनला उपचार तसंच शिक्षण घेण्यासाठी जातात. याचा अर्थ नांदेडमध्ये चांगले डॉक्टर, शिक्षण नाही असं होत नाही. लवकर बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे,” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

“आम्ही सार्वजनिक जीवनात असल्याने काहीच गुपित नसतं. आमच्या व्यक्तिगत जीवनात जास्त लक्ष द्यावं अशी अपेक्ष नाही. करोना झाल्याचं मी लोकांपासून लपवून ठेवलं नाही. मुंबईसाठी निघताना लोकांना हातही दाखवला होता. अशा गोष्टी लपवून काही फायदा होत नाही, मला ते आवडतही नाही,” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

“प्रत्येकाने आपल्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. स्वत:कडे अधिक लक्ष दिलं पाहिजे यावर गेल्या तीन चार महिन्यात सहमत झालो आहे. घरात जीम आहे तिचा वापर करतोय. क्वारंटाइन झाल्यानंतर स्वत:साठी वेळ नक्की काढणार आहे,” असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like