औरंगाबादमध्ये ८ दिवस कडक जनता कर्फ्यू; भाजीपाला, मेडिकलही बंद राहणार!

eReporter Web Team

 

औरंगाबाद: ऑनलाईन रिपोर्टर 
शहर परिसरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे १० ते १८ जुलै या कालावधीत कडक संचारबंदीची घोषणा प्रशासनाने केली. या कालावधीत उद्योग, व्यापारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेने यास प्रतिसाद द्यावा, घरात बसून सहकार्य करावं, हा प्रशासनाचा कर्फ्यू नसून हा जनतेने स्वत:हून लागू केलेला जनता कर्फ्यू आहे, असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं. तसेच संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला आणि मेडिकल दुकानेही बंद राहणार असून औषधी पुरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

आज विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कार्यालयात शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादमधील वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा जिल्हाधिकारी चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. १० जुलै ते १८ जुलै दरम्यान शहर आणि वाळूज एमआयडीसी परिसरात हा जनता कर्फ्यू असेल. आठ दिवस आपण कडकडीत बंद पाळला तर चित्रं वेगळं दिसेल. करोनाचे रुग्ण रोखण्यात आपल्याला यश येईल. त्यामुळे जनतेने हा स्वत:चा कर्फ्यू आहे, असं समजून घरीच थांबावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन चौधरी यांनी केले. तसेच वाळूज परिसरात उद्योग धंदे बंद आहेत. एमआयडीसी पूर्ण बंद आहे. शिवाय या परिसरातील लोकांनी स्वत:हून किराणा दुकानेही बंद ठेवली आहेत, असं सांगतानाच पोलीस, स्वयंसेवक आणि जिल्हा प्रशासन या जनता कर्फ्यूवर वॉच ठेवून असतील, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आज औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या ९३४ स्वॅबच्या चाचणीमध्ये आज सकाळी १५० नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. यात शहर परिसरातील १०१, तर ग्रामीण भागातील ४९ बाधितांचा समावेश आहे. यात ८५ पुरूष व ६५ महिला आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या ६८८० झाली असून, त्यापैकी ३३७४ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र आतापर्यंत ३१० बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे व सध्या ३१९६ बाधितांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like