जन की बात, कब सुनोंगे..?

eReporter Web Team

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ करुन देशातील जनतेला संबोधीत करत असतात. या ‘मन की बात’ मध्ये ते विविध विषयावर बोलतात. नवीन-नवीन ‘मन की बातचं’ कौतुक वाटत होतं. कधी नव्हे ते एक पंतप्रधान मोदी यांच्या रुपाने देशाला संबोधीत करत आहे. आज पर्यंत इतिहासात कोणताच पंतप्रधान महिन्यातून एकदा बोलला नाही, मात्र मोदी यांनी देशातील जनतेशी बोलण्यास सुरुवात केली. मन की, बात मध्ये आपले पंतप्रधान अनेक विषयावर आज पर्यंत बोलले, काही विषय चांगले होते,मन की बातमध्ये अनेक आश्‍वासने दिली गेली. जसे निवडणुकीच्या वेळी दिले गेले, तसेच मन की, बातमध्ये त्यांनी जनेतला विकासाची ‘आस’ दाखवलेली आहे. विकासाचं बोलायचं झालं तर भाजपावाले जरा कानाडोळा करतात. विकासाचा मुद्दा निघाला की, दुसराचा मुद्दा पुढे येतो, आणि यात विकासाचा मुद्दा मागे पडतो. विशेषता: वादग्रस्त मुद्दयांना हवा दिली जाते, जेणे करुन इतर विषयांची चर्चा होत नाही हे भाजपाला पक्कं माहित झालं. त्यामुळे जास्ती-जास्त वादग्रस्त विषय हातळण्यात भाजपावाल्यांना आनंद वाटत आलेला आहे. 
श्‍वानाची चर्चा झाली,माणसांची ही व्हावी! 
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी यांनी मन की, बात मध्ये श्‍वानाचा उल्लेख केला. बीड येथील श्‍वानाच्या कर्तबगारीचा आवर्जन उल्लेख करण्यात आला ही चांगली बाब आहे. मात्र देशातील जनतेचा ही विचार मन की, बात मध्ये आला पाहिजे, सध्या कोरोनाचा संक्रमण काळ सुरु आहे. आरोग्य विभागाचे अनेक ठिकाणी लक्तरे वेशीला टांगले जात आहे. कित्येक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, म्हणुन त्यांचा मृत्यू होत आहे. पुण्यातील एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला वेळेवर ऍम्ब्युलस मिळाली नाही, म्हणुन मृत्यू झाला. असे कित्येक जणांचे मृत्यू झालेले आहेत, मात्र ते समोर आले नाही.राज्यात कोणाचे की सरकार असेना, केंद्र सरकारची भुमिका महत्वाची असते. रुग्णालयात खाटा मिळत नाही, त्यामुळे बहुतांश रुग्णांना खाली झोपूनच उपचार घ्यावे लागतात. काहींना चक्क सलाईनची बाटली हातात धरुन उपचार घ्यावे लागतात. गेल्या सहा वर्षात देशातील आरोग्याच्या बाबतीत देशाने काय प्रगती केली? याचा लेखाजोखा समोर आला पाहिजे? नुसत्या घोेषणा आणि बाता मारुन उपयोग नसतो. कॉंग्रेसने सत्तर वर्षात काय केलं? याला आज महत्व नाही,सहा वर्षात भाजपाने काय करुन दाखवलं हे महत्वाचं आहे. कॉंग्रेसने काय केलं म्हणणारे कॉंग्रेसच्या काळात बांधलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या आजारावर उपचार घेतात हे महत्वाचं नाही का? त्यामुळे पुर्वी काय झालं याला कवळाटून न बसता, आपल्यामुळे देशाचा आणि जनतेचा किती फायदा झाला हे महत्वाचं आहे. माणुस हा केंद्रबिंदू आहे. त्याच्या भल्यासाठी सत्तेचा वापर झाला पाहिजे. 
गरीब भरडला गेला 
गरीबांच्या नावावर जोमाने राजकारण केलं जातं. ‘गरीबी हाटाव हा नारा’ नेहमीच दिला जातो, पण गरीबी काही हाटत नाही, आणि गरीबांच्या नावावर राजकारण काही थांबत नाही. देशातील ७० टक्के पेक्षा जास्त लोक गरीबी अंतर्गत येतात, गरीबांना रोज काम केलं तरच त्यांच्या पोटात चार घास अन्नाचे जात असतात. काम नसेल तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, लॉकडाऊने सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते गरीबांचे झाले. कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला आणि गरीब आणखी गरीब होवून बसला. गरीबांच्या हितासाठी योजना घोषीत होतात, त्या योजनेचं काय होतं हे सांगण्याची गरज नाही? गरीबांना आपल्या हक्कासाठी आणि पोटासाठी रात्र-दिवस झगडावे लागते. त्यांना कुणी वालीच नाही? पुढार्‍यांच्या बोलण्यावर गरीबांचा विश्‍वास राहिलेला नाही. बांधकाम क्षेत्रावर बहुतांश मजुरांची मजुरी अवलंबून आहे. मात्र बांधकाम बंद असल्यामुळे गरीबांच्या घरातील चुली विझल्या. उद्योग सहा महिने बंद होते, सध्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात ढील देण्यात आली असली तरी सध्याची परस्थिती तितकी सुधारलेली नाही. कामे पुर्णंता सुरु झालेले नाही. गरीबांच्या जगण्यासाठी केंद्राने कुठले पाऊल उचलले हे मनकी बातमध्ये यायला हवे होते. मन की बात ही फक्त लोकांच्या मुलभूत प्रश्‍नाबाबत व्हायला हवी. पंतप्रधान यांनी देशात खेळण्याचे उत्पादन वाढवण्याचे आव्हान केले. आज मित्तीला खेळण्याच्या साहित्याची तितकी गरज नाही, त्यापेक्षा भाकरीची गरज आहे. भाकर मिळाली तरच खेळण्याला उत्साह येईल. 
धार्मिक स्थळासाठी भाजपाचं आंदोलन 
कोरोनाचं महासंकट आहे असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे कोरोनाच्या काळात राजकारण करायचं असे दुहेरी बाण मारण्याचं काम राज्यातील भाजपाचे नेते करत आहेत. कोरोनाचं संक्रमण वाढतच आहे, ते अद्याप कमी झालं नाही. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केंद्राच्या वतीने केले जात आहे. तरी राज्यात धार्मिक स्थळ उघडण्याबाबत भाजपावाले आग्रही आहेत. राज्यात भाजपाचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस यांनी धार्मिक स्थळे उघडली असते का? आज राज्यात भाजपाची सत्ता नाही म्हणुन त्यांना दुसरा कोणताच मुद्दा सापडला नाही, त्यासाठी धार्मिक स्थळाचा मुद्दा हाती घेतला, पण त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. लोकांना भाजपावाल्याचं राजकारण समजुन आलं? देशातील जनतेचे काय हाल आहेत हे रोजच सगळे राजकीय पुढारी पाहतात, मात्र तरी त्यावर कुठलाही पवित्रा न घेता. खर्‍या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करुन इतर भावनीक मुद्यांना हात घालून राजकारण करण्याचं काम केलं जात आहे. लोकांचा जगण्याचा प्रश्‍न महत्वाचा आहे, हे राज्यातील भाजपाने समजून घेतलं पाहिजे. कुठं ही राजकारणाचं तुणतुण वाजून उपयोग नसतो. 
आत्महत्येचा आकडा पहा! 
देशात आत्महत्येचा आकडा वाढू लागला. आत्महत्येचं मुळ कारण शोधले जात नाही. बेरोजगार, मजुर, शेतकरी हे आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्यांचा विषय नेहमीच चर्चेला जातो. त्यावर काही ठोस उपाय योजना आखल्या जात नाहीत. देशातील  शेतकरी आथिकदृष्टया कमकुवत आहे. आता पर्यंत शेतकर्‍यांनी आपल्या हक्कासाठी कित्येक वेळा गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत आंदोलन केले, मात्र सरकारला  शेतकर्‍यांची कीव आली नाही. शेतकरी देशाचा आधारस्तंभ आहे, शेतकरी असेल तरच देशातील जनता अन्न खावू शकेल, शेतकरी नसेल तर कुणीच जगणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला आधी प्राधान्य दिले पाहिजे. दुर्देवाने ते दिले जात नाही. सत्तेत येण्यापुर्वी शेतकर्‍यांच्या हिताच्या मोठ-मोठ्या गप्पा भाजपावाले मारत होते, सत्ता येताच आता शेतकर्‍यांच्या विषयावर एक शब्द ही बोलत नाहीत. शेतीवर फक्त शेतकरीच अवलंबून नाही, त्यावर इतर मजुर ही अवलंबून आहे. शेतीवर मजुरी करणारा मजुर शेतकर्‍या सारखाच आर्थिक संकटात सापडला. शेतकर्‍यांच्या आत्महत्येची आकडेवारी दिवसे-दिवस वाढत आहे. दरववर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्येच्या आकड्याबाबत पुढारी शांत असतात. गेल्या वर्षभरात देशात कृषी, रोजंदारी क्षेत्रावरील ४३ हजार लोकांनी आत्महत्या केल्या. आत्महत्येची ही आकडेवारी भयावह आहे. यावर चिंतन झालं पाहिजे, मात्र त्यावर चर्चा करायला केंद्रातील सरकारला वेळ नाही. मनकी बातमध्ये अनेक विषयावर चर्चा होत आहे. लोकांचे प्रश्‍न काय आहेत हे ही समजून घेतले पाहिजे. त्यांचा उल्लेख मनकी बात मध्ये आला पाहिजे. शेेतकर्‍यांच्या आत्महत्या बाबत मन की बात मध्ये पंतप्रधानांनी बोललं पाहिजे, आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस भुमिका घेतली पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या अमंलबाजवणी बाबत बोललं पाहिजे, तरच लोक मन की बात ऐकतील, यावेळी मनकी बातला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. लोकांनी मन की बातला डिस्सलाईक केलं, असं पहिल्यांदा झालं. लोक आता मनकी बातला कंटाळले आहेत. सोशल मीडीयावर ही त्याचा कंटाळा येवू लागला. नुसतं बोलण्याने विकास होत नसतो, त्याला कृती करावी लागते, तेव्हाच लोकं स्विकारत असतात. भावनेचं राजकारण जास्त दिवस टिकत नसतं, हे समजुन घेतलं पाहिजे. मन की, बात विकासाची बात झाली पाहिजे. लोकांना काय हवयं हे जाणुन घेतलं पाहिजे, त्या दिशेने पाऊल टाकायला हवं.   


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like