हाथरसमधली घटना पाशवी! महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?- राज ठाकरे

eReporter Web Team

ऑनलाईन रिपोर्टर 

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडना घडल्यानंतर सध्या देशभरात सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेला काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला धारेवर धरत आहेत. पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला असून, ही घटना पाशवी असल्याचं म्हटलं आहे. याचसोबत महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांनाही जाब विचारला आहे.

काय आहे राज यांची पोस्ट

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारा दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?

बरं, समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?

महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत. त्यांना का जाब विचारला जात नाहीये?

हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे.

राहुल गांधी यांचेही समर्थन
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र, त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी " ये देखो आज का हिंदुस्तान," असं राहुल गांधी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले. या घटनेचा उल्लेख राज यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे? असा प्रश्न राज यांनी विचारलाय.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like