निगडीच्या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये ऊसतोड कामगार महिलेची मृत्यूशी झुंज

eReporter Web Team


पुणे/बीड (रिपोर्टर)- मुलीच्या बाळांतपणासाठी पुणे येथे गेलेली महिला
अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर तिला उपचारार्थ
पुणे येथील लोकमान्य धर्मादाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ
दिवसांच्या कालखंडात या हॉस्पिटलमध्ये महिलेच्या नातेवाईकांनी मेडिसीनसह
तीन ते साडेतीन लाख रुपये भरले मात्र अद्यापही साडेसहा ते सात लाख
रुपयांचे बील सदरचे धर्मादाय हॉस्पिटल महिलेच्या नातेवाईकांकडून मागत
असून महिला अद्यापही गंभीर अवस्थेत असल्याचे सांगण्यात येते. सदरची महिला
ही बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेल्या पिंपरखेड येथील ऊसतोड
कामगार असून धर्मादाय हॉस्पिटल असताना पैशासाठी जखमी महिलेच्या
नातेवाईकांना हॉस्पिटल त्रास देत असल्याची तक्रार होत आहे. दुसरीकडे
ऊसतोड कामगारांसाठी रान उठवणार्‍या एकाही संघटनेने अथवा ऊसतोड
कामगारांच्या नेत्यासह मातेने या गंभीर प्रकरणाकडे अद्याप लक्ष दिले
नसल्याचे दिसून येते.
    वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील मंगल साहेबराव सत्वधर ही महिला
गेल्या काही दिवसांपूर्वी मुलीच्या बाळांतपणासाठी पुणे येथील काळेवाडी
येथे मुलीच्या सासरी गेली. पांडुरंग गुंजाळ हे सदरील महिलेचे ईवाई असून
छाया पांडुरंग गुंजाळ या इनबाई आहेत. 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात
हल्लेखोरांनी गुंजाळ यांच्या काळेवाडी येथील घरात घुसून हल्ला चढवला आणि
एखाद्या कठीण वस्तूचा मारा छाया गुंजाळ यांच्या डोक्यात केला. त्याचवेळी
तिथे झोपलेल्या मंगल साहेबराव सत्वधर (रा. पिंपरखेड) यांनाही मोठी मारहाण
करण्यात आली. या हल्ल्यात छाया गुंजाळ या जागीच ठार झाल्या तर मंगल
सत्वधर ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ पुण्यातील निगडी येथील
लोकमान्य धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगल
सत्वधर ह्या ऊसतोड कामगार असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.
धर्मादाय हॉस्पिटल असल्याने या ठिकाणी कमी खर्चात उपचार होईल, असे वाटत
असतानाच हॉस्पिटल मॅनेजमेंटने मात्र नातेवाईकांना हे पुर्णत: खाजगी
हॉस्पिटल असून इथे पैशाशिवाय उपचार होत नाही, असे स्पष्ट सांगितले. त्या
स्थितीत गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात ऑपरेशनसाठी आणि मेडिकलसाठी तीन ते
साडेतीन लाख रुपये सत्वधर यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये भरले मात्र
अद्यापही साडेसहा ते सात लाख रुपये सदरचे हॉस्पिटल हे मंगल सत्वधर
यांच्या कुटुंबियांकडे मागत आहे, अद्याप गंभीर जखमी असलेले मंगल सत्वधर
यांची प्रकृती सुधारलेली नसून ती चिंताजनक आहे. ऊसतोड कामगारांकडे एवढे
पैसे येणार कुठून? हा प्रश्‍न उपस्थित होत असतानाच धर्मादाय असलेल्या
हॉस्पिटलमध्ये पंतप्रधानांच्या योजनेचाही लाभ मिळत नसल्याचे दिसून आले
आहे. ऊसतोड कामगार महिलेच्या जिवाशी खेळ अद्याप सुरुच असून दुसरीकडे
मात्र ऊसतोड कामगारांच नेते कामगारांच्या भल्यासाठी काम करत असल्याचे
देखावा राज्यभर करत असल्याचे दिसून येतात मात्र अद्यापही या ऊसतोड कामगार
महिलेच्या उपचारासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंटशी कुणी बोलल्याचे दिसले नाही.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेल्या पिंपरखेड येथील या महिलेची
मृत्यूशी झुंज सुरू आहे. बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांचे मोठे नेते माता,
पिता असल्याचे सांगण्यात येते मात्र या प्रकरणात महिलेला मदत करण्यासाठी
अद्याप कुणी पुढे आल्याचे दिसून आले नाही.

कुठयत ऊसतोड कामगारांच्या माता आणि नेता ?
वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील मंगल साहेबराव सत्वधर ही ऊसतोड कामगार
महिला पुण्याच्या निगडी येथील लोकमान्य धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मृत्युशी
झुंज देत आहे, आतापर्यंत साडेतीन लाख रुपये हॉस्पिटलला दिले आहेत, अजून
सहा ते सात लाख रुपयांची मागणी केली जात आहे. महिलेचे कुटुंब आणि
नातेवाईक गरीबीतले आहेत, ऊसतोड कामगार आहेत. मग ऊसतोड कामगारांसाठी नेता
आणि माता म्हणवून घेणारे या महिलेसाठी संबंधित हॉस्पिटलला का भांडत
नाहीत? त्या महिलेवर उपचार होण्यासाठी मदत का करत नाहीत? ऊसतोड
कामगारांच्या भल्याचा नुसता देखावाच केला जातोय का? कुठय त्या संघटना?
असा सवाल आता विचारला जातोय.
 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like