​​​​​​​हाथरस प्रकरण योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे आणि अमानवी पद्धतीने हाताळले, मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा; शिवसेना आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी

eReporter Web Team

ऑनलाईन रिपोर्टर 

उत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा देशभरातून निषेध केला जात आहे. जागोजागी विरोधीपक्षाकडून आंदोलन केले जात आहेत. यासोबतच योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात आहे. आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. योगी सरकार हे प्रकरण बेजबाबदार आणि अमानवी पध्दतीने हातळत आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना द्यावा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची विनंती केली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो.' असे ते म्हणाले आहेत.

हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. चार नराधमांनी तिच्यावर दृष्कृत्य करत मारहाण केली. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलिसांनी रात्री उशीरा तिच्या गावी तिचे अंत्यसंस्कार गुपचूप केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like