निजामाबादच्या सलामी फलंदाजांनी बीडच्या नटराजला नमवलं ; जिल्हा स्टेडियमवर तोबा गर्दी

eReporter Web Team


जिल्हा स्टेडियमवर क्रिकेट चाहत्यांची तोबा गर्दी
रंजक आणि अतितटीचे सामने; रिपोर्टर टी-१० ची चर्चा जिल्ह्याबाहेर; ऍपवर लाईव्ह स्कोअर; युट्यूबवर लाईव्ह सामना


बीड (रिपोर्टर): रिपोर्टर आयोजित टी-१० लेदर बॉल क्रिकेट चषक स्पर्धेच्या सहाव्या दिवसातला पहिला सामना नटराज क्लब बीड विरूद्ध नईम ११ निजामाबाद झाला. या सामन्याची नाणेफेक दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. नाणेफेक बीडच्या नटराज क्लबने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दहा षटकात ८ गडी बाद होत अवघ्या ४५ धावा नटराज क्लबला काढता आल्या. तर नईम ११ निजामाबाद संघाच्या सलामीवीरांनीच ३ षटक ३ चेंडूत ४७ धावा काढून नटराज क्लबवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. 
रिपोर्टर आयोजित टी-१० लेदर बॉल क्रिकेट चषक स्पर्धा गेल्या सहा दिवसांपासून श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असून अनेक सामने हे अत्यंत चुरशीचे होत असल्याने मैदानात जिल्हाभरातून हजारो क्रिकेट चाहते उपस्थिती लावीत आहेत. सहाव्या दिवसाचा पहिला सामना नटराज क्लब बीड विरूद्ध नईम ११ निजामाबाद असा झाला. दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली.  नटराज क्लबचे कर्णधार रितेश वाघमारे आणि नईम ११ निजामाबादचे कर्णधार सय्यद नईम यांनी मैदानात उतरून नाणेफेक केली. सदरची नाणेफेक ही बीडच्या नटराज क्लबने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीचे फलंदाज मैदानात उतरले खरे परंतू नईम ११ च्या गोलंदाजासमोर त्यांचा निभाव लागू शकला नाही. नईम ११ च्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत नटराज क्लबच्या फलंदाजांना अडकून ठेवले. एकापाठोपाठ एक असे आठ फलंदाज १० षटकामध्ये तंबूत परतले. तेव्हा नटराज क्लबला केवळ ४५ धावा काढता आल्या. नटराज क्लबचा सोनू चौरे या फलंदाजाने १६ चेंडूत २ चौकार लगावत १८ धावा काढून नटराजची धाव संख्या ४५ वर नेहून ठेवली. हे ४५ चे आव्हान निजामाबादच्या नईम संघासाठी अत्यंत किरकोळ होतं. नईम संघाचे सलामी फलंदाज मैदानात उतरले आणि त्यांनी नटराज क्लबच्या गोलंदाजावर तुटून पडणे पसंत केले. अवघ्या ३ षटक ३ चेंडूत ४५ धावांचा पाठलाग करून ४७ धावा केल्या आणि नटराज क्लबचा १० गडी राखून दणदणीत पराभव केला. या खेळात नईम संघाचा प्रदीप जगदाळे या फलंदाजाने १२ चेंडूत ६ चौकार लगावत २५ धावा केल्या तर सईद नईम याने ९ चेंडूत १ चौकार लगावत १९ धावा काढून हा सामना जिंकून दिला. सामनावीर हा नईम संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रदीप जगदाळे हा ठरला. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like