दुपारच्या सामन्यात आदर्श  ठरला क्रिकेटचा सिकंदर

eReporter Web Team


चुरशीच्या सामन्यात आदर्शचा दणदणीत विजय; १ चेंडू ४ रण अन् वसीम शेखचा षटकार

बीड (रिपोर्टर): रिपोर्टर आयोजित टी-१० चषक स्पर्धेच्या सहाव्या दिवसाचा दुसरा सामना अत्यंत चुरशीचा झाला. हा सामना होता सिकंदर क्रिकेट क्लब विरूद्ध आदर्श क्लब बीड या सामन्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. ही नाणेफेक सिकंदर क्रिकेट क्लब बीडने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  १० षटकात ५ गडी बाद होत सिकंदर क्रिकेट क्लबने आदर्श समोर ९५ धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान आदर्श बीडने स्विकारत मैदानात उतरणं पसंत केलं. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना अत्यंत रंजक ठरला. १ चेंडू आणि ४ धावा आदर्शला विजयासाठी आवश्यक होत्या मात्र आदर्श क्लबच्या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आदर्श क्लबला विजय मिळवून दिला. हा सामना अत्यंत रंजक ठरला होता. हजारो उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी या सामन्यादरम्यान प्रचंड दाद दिली.  
सहाव्या दिवसातला दुसरा सामना सिकंदर क्रिकेट क्लब बीड विरूद्ध आदर्श क्रिकेट क्लब बीड असा होणार असल्याने हा सामना पाहण्यासाठी बीड शहरासह जिल्हाभरातून हजारो क्रिकेट चाहते श्रीमंत योगी  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर डेरेदाखल झाले होते. दुपारी सिकंदर क्रिकेट क्लबचे कर्णधार शहबाज काझी व आदर्श क्रिकेट क्लबचे कर्णधार आकाश जगताप हे मैदानात उतरले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांनी नाणेफेक केली. ही नाणेफेक सिकंदर क्रिकेट क्लबने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीचे फलंदाज मैदानात उतरले. तेव्हा त्यांना सूर सापडला नाही. मात्र जेव्हा या संघाचा अष्टपैलू खेळाडू शहबाज काझी मैदानात उतरला आणि त्याने खेळाचे सूत्र आपल्या हाती घेतले तेव्हा शहबाज काझीने २४ चेंडूत ४ षटकार, ४ चौकार लगावत ४८ धावा आपल्या संघाला दिल्या. अर्धशतकाच्या जवळ असलेला शहबाज बाद झाल्याने २ धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं तर याच संघाचा दुसरा खेळाडू निखील याने २६ चेंडूत ३ चौकार १ षटकार लगावत २७ धावा काढल्या. १० षटकात सिकंदर क्रिकेट क्लबने ५ बाद ९५ धावांचं आव्हान आदर्श क्रिकेट क्लब बीड समोर ठेवलं. आतापर्यंत सिकंदर क्लबने दोन सामने या स्पर्धेत जिंकले होते त्यामुळे हा सामनाही सिकंदर क्लब जिंकेल असे प्रेक्षकांना वाटत असतांनाच आदर्श क्लबने सिकंदर क्लबच्या ९५ धावांचं आव्हान स्विकारत आपले सलामीचे फलंदाज मैदानात उतरविले. सिकंदर क्लबच्या गोलंदाजांनी आदर्श क्लबच्या फलंदाजांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. सामना अत्यंत रंजक आणि अतितटीचा होत चालला. शेवटच्या दोन षटकात अक्षरश: उपस्थित प्रेक्षकांच्या उरात धडकी भरताना दिसून येत होती. कोण जिंकेल? याचा अंदाज लागत नव्हता. तोपर्यंत आदर्श क्लबचे ७ गडी तंबूत परतले होते. मात्र जेव्हा आदर्श क्लबच्या वसीम शेखने मैदानात उतरून फटकेबाज खेळी खेळायला सुरूवात केली तेव्हा या खेळातील चूरस अगदीच वाढली. ९ षटके आणि पाच चेंडू संपलेले असतांना आदर्शला विजयासाठी ४ धावा काढायच्या होत्या. एक चेंडू शिल्लक होता. गोलंदाजांनी चेंडू टाकला तसा आदर्श बीडचे वसीम शेख याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि हा सामना आदर्श क्लबला जिंकून दिला. वसीम शेख याच्या निर्णायक खेळीमुळे या सामन्याचा सामनावीर वसीम शेख ठरला. त्यास झुंजार नेताचे संपादक अजीत वरपे व किशोर जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like