औरंगाबादच्या इएमआय संघने देवलेकर बीपीएल ४ संघाला अवघ्या ५६ धावात गुंडाळलं

eReporter Web Team


इएमआयच्या शेख अतिफची अर्धशतकी खेळी; ६१ धावांनी इएमआयचा विजय
बीड (रिपोर्टर): श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेल्या रिपोर्टर आयोजित टी-१० लेदर बॉल क्रिकेट चषक स्पर्धेच्या सातव्या दिवसातील दुसरा सामना इएमआय स्पोर्ट औरंगाबाद विरूद्ध देवलेकर बीपीएल ४ या संघात खेळवण्यात आला. या सामन्याची नाणेफेक नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली. ही नाणेफेक औरंगाबादच्या इएमआय स्पोर्ट संघाने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानात उतरलेल्या फलंदाजांनी १० षटकात ११७ धावांचे आव्हान देवलेकर बीपीएल ४ समोर ठेवले. मात्र हे आव्हान देवलेकर बीपीएल ४ ला अत्यंत अवघड गेले. ते केवळ १० षटकात ५६ धावा करू शकले. त्यामुळे औरंगाबादच्या इएमआय संघाचा ६१ धावांनी दणदणीत विजय झाला. 
रिपोर्टर आयोजित टी-१० लेदर बॉल क्रिकेट चषक स्पर्धेत दुसरा सामना अत्यंत एकतर्फी झाल्याचे पहायला मिळाले. औरंगाबाद इएमआय संघाच्या गोलंदाजापुढे देवलेकर बीपीएल ४ संघाच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. सामना सुरू करण्यापूर्वी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागरांच्या उपस्थितीत इएमआय औरंगाबाद संघाचे कर्णधार मुनीर गाझी आणि देवलेकर बीपीएल ४ संघाचे आवेज मोमीन नाणेफेक करण्यात आली. ही नाणेफेक औरंगाबादच्या इएमआय संघाने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानात उतरलेल्या इएमआयच्या शेख अतिफ या फलंदाजाने धुवाधार खेळी करत ६ चौकार आणि ३ षटकाराच्या जोरावर ५० धावा काढून अर्धशतकाचा मान मिळवला तर खालेद कादरी या फलंदाजाने ११ चेंडूत २ चौकार लगावत १६ धावा काढल्या. औरंगाबादच्या इएमआय स्पोर्टने १० षटकात ५ गडी गमावून ११७ धावांचे आव्हान देवलेकर बीपीएल ४ समोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा देवलेकर बीपीएल ४ चे सलामी फलंदाज मैदानात उतरले. तेव्हा इएमआय औरंगाबादच्या गोलंदाजासमोर त्यांनी नांगी टाकली. पहिल्याच षटकात दोघांना तंबूत परतून इएमआय संघाच्या गोलंदाजांनी देवलेकर बीपीएल ४ संघावर दबाव आणला. शेवटपर्यंत देवलेकर बीपीएल ४ संघाच्या फलंदाजाला सूर सापडला नाही. या संघातला सिद्धीकी कुरेशी याने सहा चेंडूत ३ चौकार लगावत १४ धावा काढून जेमतेम खेळी केली. मात्र इएमआयचे गोलंदाज आक्रमक पहायला मिळाले. शेवटी १० षटकामध्ये ७ गडी तंबूत परतले आणि ते केवळ ५६ धावा करू शकले त्यामुळे इएमआय औरंगाबाद संघाने देवलेकर बीपीएल ४ संघावर तब्बल ६१ दावांनी विजय मिळवला. या सामन्याचे सामनावीर शेख अतिक यांचा रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, पत्रकार जावेद पाशा, शेख शफीकभाऊ यांच्या हस्ते ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like